सफर
प्रवास, माझासाठी तरी प्रवास म्हणजे नेहमी एक वेगळा अनुभव असतो. प्रवास मला एक नवीन व्यक्तीचीच नाही तर एका नवीन जागेची आणि वेगळ्या अनुभवाची भेट देत असतो. खरंच वर्षात एकदा तरी आपण एका मोठ्या प्रवासाला जायला हवे (ट्रीप नाही, ट्रीप तर आठवड्यातून एकदा व्हायला हवी).
आजचा ब्लोग असाच एका प्रवासा बद्दलचा आहे. जळगाव ते नवसारी, एप्रिल २००८, मी आणि बहिणेचे सासरेबुवा आम्ही जळगावचा बस स्थानकावरून सकाळी सुमारे ११ वाजता निघालो. जळगावच एप्रिल महिन्यातलं उन आणि गाडीतील गर्दी यामुळे खूप चिडचीड झाली होती. नशिबान आम्हाला जागा मिळाली. थोड्याच वेळात गाडीने वेग घेतला. आम्ही जळगावचा बाहेर पडलो आणि मला कधी झोप लागली ते कळलेच नाही.
साधारण एक दोन तासानंतर जाग आली तेव्हा आम्ही साक्रीचा आसपास होतो. बाहेरील द्रुश्य मी विचार केला होता त्या पेक्ष्या खूप वेगळं होतं. बाहेर जमीन पार ओसाड दिसत होती. बर्याच दूर पर्यंत खूप कमी झाडं होती. बरेच शेतकरी आपल्या जागेची मशागत करत होते. पुढील एक दोन तासाचा प्रवास असाच झाला.
सुमारे दुपारचा २ चा सुमारास आमची गाडी एका रेल्वेफाटका पाशी थांबली. आम्ही नेमके कुठे होते ते कळले नाही. पण गुजराथ बोर्डर चा आसपास असेल असा माझा अंदाज. आधीपासुनच तिथे बरीच वहाने थांबली होती. आमची गाडी थांबताच एका झाडाखालील मुलींचा ग्रुप आनंदात पेरू आणि काकड्या विकण्या साठी आला. बस आल्या मुळे त्यांना खुप आनंद झाला होता. त्यातील एक मुलगी खुप उत्साहित होती. तिचा हातात मावतील असे सहा पेरू ती प्रत्येक खिडकीत जाऊन विचारात होती. कोणी पेरू विकत घेतले तर पळत जाऊन झाडाखालील तिच्या छोट्याश्या दुकानातून परत आणत होती. असं करत ती माझाही खिडकी पाशी आली. मला भूख नसल्या मुळे मी नकार दिला. पण निराश न होता ती लगेच पुढच्या खिडकी कडे वळाली. तिच्यात असलेला उत्साह पाहून खरंच खुप प्रसन्न वाटलं. स्पर्धा ही होतीच. कोणी दुसरा आधी जाऊन एखाद्या खिडलीला पेरू तर नाही ना विकणार याची चिंता ही होती. आता तिने प्रत्येकाला दोनदा तरी विचारले असेल. साधारणता तिने १७-१८ पेरू विकले असतील. तिचा हातातील १५-२० रुपयांची चिल्लर ती मोजत होती आणि झालेल्या कमाई साठी खूप खुशही होती. बाहेरील कडक उन ती पार विसरली होती. तिचा उत्साह मात्र कमी नव्हता झाला. आता तिची नजर बसच्या पुढे उभी असलेल्या कलिंगडच्या गाडीवर पडली. तिचा चेहरा अजुन खुलला. हातातली चिल्लर तिने परत मोजली आणि पळत जात गाडीवर असलेल्या दोघांन पैकी एकाला विचारलं, "कलिंगड केवढ्याला दिलं?".
तो माणूस तिला पाहून आधी हसला आणि विनोदी स्वरात म्हणाला की, "तुझा कडे किती पैसे आहेत?".
तिला ते लगेच लक्ष्यात आले. पण हिम्मत न सोडता तिने जोरात विचारले, "कितीला दिलं ते सांग".
त्या माणसाचा विनोद आजूनही संपला नव्हता. तिचा कडे बघत तो म्हणाला, "५० रुपयाच आहे. बोल किती पाहिजे?".
मुलगी हातातील चिल्लर पुढे करत म्हणाली, "माझा कडे २२ रुपये आहेत. एक छोटा पाहून दे".
त्यावर मनुष्य परत हसला आणि म्हणाला, "२२ रुपयात कलिंगड येत नाही. कलिंगड मोठे आणि महाग आहेत".
आता मात्र मुलीचा चेहरा थोडा पडला होता. पण तरीही ती युक्ती लढवत म्हणाली. "मी तुला २२ रुपये आणि काही पेरू देते, मला एक कलिंगड दे."
माणसाला अजुन ही तिची दया आली नव्हती. तो मित्रा कडे बघत हसत म्हणाला, "ही वेडी पेरू देऊन कलिंगड विकत घेते आहे."
आता मात्र पोरीचा चेहरा पार पडला होता. नाराज होऊन ती परत झाडाखाली जाऊन उभी राहिली. स्वतःशीच काही तरी बडबडत होती. चिडली होती आणि नाराज झाली होती. दोन मिनिट वाटलं कि आपल्या हातातल्या ५० रुपयांची किंमत खरंच तिचा अनमोल आनंदा एवढी आहे? तिला बोलावून ते ५० रुपये द्यावेसे वाटले. पण ती आता परत बस पाशी येणार नव्हती. काही करून परत तिचा चेहऱ्या वरचा आनंद पाहण्याची इच्छा होती.
एवढ्यात एक बस आमच्या मागे येऊन उभी राहिली. बस पाहताच तिचा चेहरा परत खुलला. परत ती त्याच उस्ताहात बस कडे निघाली. २ मिनिट पूर्वीचे सगळ काही विसरत हातात सहा पेरू घेऊन बस कडे पळाली. तिचा चेहऱ्यावर तो आनंद आणि उस्ताह दोन पटीने परत आला होता. असं वाटलं की देवानेच ती बस पाठवली होती. त्याची महिमा खरंच वेगळी आहे. आयुष्याचा या प्रवासात त्याने सुखदुख्खाचा वाटा योग्य प्रकारे ठेवला आहे.